उद्योगमंत्र्यांची पत्नी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत ! निलम शिर्के, वर्षा उसगावकर, सुशांत शेलार, सतीश रणदिवे, आनंद काळेंचे अर्ज, मातब्बर कलाकार निवडणुकीपासून लांबच ! !
schedule22 May 26 person by visibility 205 categoryसामाजिक
आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ ही चित्रपट व्यावसायिकांची संस्था. तब्बल दहा वर्षांनी या महामंडळाची निवडणूक होत आहे. १७ जागेसाठी साठ अर्ज दाखल झाले आहेत. निर्माता व दिग्दर्शक गटातून दोन संचालक निवडले जातात. अभिनेत्री गटातून वर्षा उसगावकर, निलम शिर्के यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या निलम शिर्के या पत्नी आहेत. या निवडणुकीसंबंधी महामंडळाच्या सभासदांमध्ये कमालीची उत्सुकता असताना दुसरीकडे मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचे अभिनेते व अभिनेत्री हे निवडणुकीपासून लांबच राहिले. पॅनेल प्रमुखांवर, अभिनेता गटात उमेदवार शोधताना दमछाक व्हायची वेळ आली. अभिनेता गटात तर कलाकारांना उमेदवारी घ्या...यासाठी विनविण्या कराव्या लागल्याचे चित्र आहे. निवडणुकीिसंदर्भात आघाडीच्या अभिनेत्यांचा हा अनुत्साह योग्य नाही अशा भावना सभासदातून व्यक्त होत आहेत.
निर्माता, दिग्दर्शक, लेखक-कथा-पटकथा-संवाद-गीते, स्थिर व चलत चित्रण, संकलन-ग्राफीक्एस-अॅनिमेशन –व्हीएफएक्स, अभिनेता – साहस दुृश्ये, अभिनेत्री, कलादिग्दर्शक, संगीत – पार्श्वगायन- संयोजक, नृत्यदिग्दर्शक –नर्तक –नर्तिका, ध्वनीरेखक-पुर्नध्वनीरेखक, निर्मिती व्यवस्था –व्यवस्थापकीय यंत्रणा, रंगभूषा -वेशभूषा-केशभूषा, वितरण - स्टुडिओ - लॅब – प्रदर्शन –प्रसिद्धी, कामगार अशा पंधरा गटातून सतरा संचालक निवडले जातात. निर्माता व दिग्दर्शक गटातून प्रत्येकी दोन संचालक निवडून द्यायचे आहेत. मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, कोकणसह राज्यातील विविध भागात सभासद मतदार आहेत. शिवाय गोवा, बेळगाव येथेही सभासद मतदार आहेत. ३४०३ सभासद मतदार आहेत.
चित्रपट महामंडळाची यापूर्वी २०१६ मध्ये निवडणूक झाली होती. २०२१ मध्ये कार्यकारिणीाची मुदत संपली. २०२२ मध्ये चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. मात्र मतदार यादीवरुन कोर्टकचेरी सुरू झाली आणि पाच वर्षे निवडणूक लांबली. आता सात जून २०२६ रोजी महामंडळाच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. कोल्हापूर, पुणे आणि मुंबई या तीन विभागात मतदानाची सोय आहे. दरम्यान या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे केंद्र कोल्हापूर होते. २२ मेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत होती. सतरा जणांच्या कार्यकारिणीसाठी ६० उमेदवारी अर्ज दाखल आहेत.
महामंडळाचे माजी अध्यक्ष मेघराज भोसले, अभिनेत्री निलम शिर्के, अभिनेता आनंद काळे हे एकत्र येऊन पॅनेलची तयारी करत आहेत. तर दिग्दर्शक सतीश रणदिवे, अभिनेत्री वर्षा ऊसगावकर, लेखक पितांबर काळे हे ही पॅनेलच्या तयारीत आहेत.निलम शिर्के यांनी शुक्रवारी, कोल्हापुरातील महामंडळाच्या मुख्य कार्यालयात येऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. त्या, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या पत्नी आहेत. यंदाच्या निवडणुकीसाठी महामंडळाचे माजी उपाध्यक्ष धनाजी यमकर, मिलिंद अष्टेकर, संचालक शरद चव्हाण, रणजीत जाधव, पितांबर काळे, चैत्राली डोंगरे, सतीश बीडकर, सदानंद सुर्यवंशी, रवी गावडे, बाळू बारामती, यांनी उमेदवारी अर्ज भरले. अभिनेता गटात आनंद काळे, सुशांत शेलार, प्रदीप कोतमिरे यांचे अर्ज आहेत. नृत्य दिग्दर्शक गटात अनिल सुतार, संग्राम भालकर, कला दिग्दर्शक गटात शाम लोंढे, अमर मोरे, सुनील घोरपडे यांचे अर्ज आहेत. निर्मात गटात विजय शिंदे, गणेश शिंदे, दिग्दर्शक गटातून सतीश रणदिवे, विजय राणे, दीपक कदम निवडणूक लढविणार आहेत. याशिवाय अन्य गटातून महेश देशपांडे, सुभाष गुंदेशा, बाबा लाड, आकाराम पाटील, आदींचे अर्ज आहेत. उमेदवारी अर्ज माघारीची मुदत २६ ते २८ मे या कालावधीत आहे. त्यानंतर कोण रिंगणात असणार, कोणाचे पॅनेल होणार हे स्पष्ट होईल.