ऋतुराज पाटील हे विधानसभेत हवे होते - सिद्धेश कदम यांचे विधान चर्चेत
schedule02 May 25 person by visibility 179 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : “ ऋतुराज पाटील हे तरुण आहेत, अभ्यासू आहेत. अभ्यासू लोकप्रतिनिधी प्रमाणे ते विषयांची मांडणी करतात. ते विधानसभेत हवे होते.”असे कौतुकोदगार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी काढले. कदम यांचे हे विधान चर्चेचे ठरले. सिद्धेश कदम शिवसेनेचे नेते व माजी मंत्री रामदास कदम यांचे चिरंजीव आहेत. महायुती सरकारमधील गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे बंधू आहेत.
पर्यावरण आणि वातावरण बदल विभाग महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी दोन मे 2025 रोजी "पर्यावरणीय अर्थशास्त्र आणि संधी" या विषयावर एक दिवसीय परिषद आयोजित केली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, स डी वाय पाटील एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त ऋतुराज संजय पाटील आणि कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत या परिषदेचे सकाळी साडेदहा वाजता उद्घाटन झाले. हॉटेल सयाजी येथील मेघ मल्हार सभागृहात परिषद झाली.यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रणमंडळाच्या वतीने आयोजित परिषदेसाठी डीवाय पाटील ग्रुपने विशेष सहकार्य केल्याबद्दल सिद्धेश कदम यांच्या हस्ते माजी आमदार ऋतुराज पाटील यांचा सन्मान करण्यात आला. तर ऋतुराज पाटील यांच्या हस्ते कदम यांचा करवीर निवासिनी अंबाबाईची मूर्ती, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना माजी आमदार व डी वाय पाटील एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त ऋतुराज पाटील यांनी पर्यावरण संवर्धन, प्रदूषणाची समस्या या अनुषंगाने ऊहापोह केला. २०१९ ते २०२४ या कालावधीत आमदार म्हणून पर्यावरण संवर्धनासाठी केलेल्या कामाची माहिती ही सांगितली. तसेच महापालिकेचे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प व अन्य माध्यमातून प्रदूषण मुक्तीसाठी सुरू असलेल्या कामावरही प्रकाशझोत टाकला.
माजी आमदार पाटील आणि भाषणाच्या ओघात, डी वाय पाटील विद्यापीठामार्फत पर्यावरण संवर्धन वृक्षारोपण यासंदर्भात विविध उपक्रमांची अंमलबजावणी केले असल्याचे सांगितले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी या परिषदेत मार्गदर्शन करताना राज्यातील विविध भागात आपण भेटी देत आहोत. प्रदूषणमुक्तीच्या अनुषंगाने विविध घटकांशी चर्चा करत आहोत. त्या अनुषंगाने कोल्हापुरात परिषद होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. भाषणात कदम यांनी माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या कामकाजाचे कौतुक केले.
कदम म्हणाले, " ऋतुराज पाटील हे तरुण आहेत, अभ्यासू आहेत. त्यांनी अभ्यासू लोकप्रतिनिधीप्रमाणे पर्यावरण संवर्धन व प्रदूषण समस्यांची मांडणी केली. खरे तर ते विधानसभेत दिसायला हवे होते. ते येथेच थांबणार नाहीत. त्यांचे काम यापुढे चालू राहील."