स्वतंत्र महाराष्ट्र राज्य स्थापण्यासाठी कोल्हापुरातूनही उभारले होते जन आंदोलन – प्राचार्य अभयकुमार साळुंखे
schedule03 May 25 person by visibility 68 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महाराष्ट्राला संतांची, शाहिरांची, सामाजिक व शैक्षणिक सुधारकांची मोठी परंपरा आहे. त्यामुळेच विविधतेमधील एकता महाराष्ट्र राज्यात देशाच्या एकात्मतेसाठी टिकून राहिलेली आहे. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसाठी अनेकांनी बलिदान दिले. त्यामुळे स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची स्थापना होणेसाठी कोल्हापूरमधून जनआंदोलन उभे राहिले. महिला आंदोलनात संस्थामाता श्रीमती सुशीलादेवी साळुंखे यांचाही महत्वाचा सहभाग होता. असे विचार श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी व्यक्त केले.
विवेकानंद कॉलेज परिसरात एक मे, महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी, कार्याध्यक्ष साळुंखे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण सचिव प्राचार्या शुभांगी गावडे व संस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना प्राचार्य साळुंखे म्हणाले, ‘महाराष्ट्राची कला, क्रीडा, उद्योग, शैक्षणिक अशा सर्व क्षेत्रात प्रगती होत आहे. आजच्या युवकांनी राज्य ऐक्याच्या भावनेतून देशाला प्रगतीपथाकडे न्यावे.’
यावेळी एन.सी.सी.च्या विद्यार्थ्यांनी ध्वजास मानवंदना दिली. संस्था परिसरातील डॉ.बापूजी साळुंखे इंजिनिअरींग कॉलेज, डॉ.बापूजी साळुंखे हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिटयूट, सावित्रीबाई फुले नर्सिंग कॉलेज, न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी, संस्था कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे संयोजन जिमखाना प्रमुख डॉ.विकास जाधव, मेजर सुनिता भोसले, लेफ्टनंट जे आर.भरमगोंडा, प्रा संतोष कुंडले, प्रा.समीर पठाण, प्रा.प्रशांत कांबळे रजिस्ट्रार, एस.के.धनवडे, अधिक्षक संजय दळवी, रवी चौगुले यांनी केले.