रमणलाल स्मृती फाउंडेशनचा कोरे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना आर्थिक आधार
schedule05 Sep 25 person by visibility 214 categoryशैक्षणिकलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : स्वर्गीय रमणलाल मणियार यांच्या ३७ व्या स्मृतिदिनानिमित्त तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयातील सहा विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी रमणलाल स्मृती फाउंडेशनने जमा केली. शैक्षणिक शुल्क पोटी फाउंडेशनने १ लाख ६५ हजार इतकी रक्कम महाविद्यालयाकडे सुपूर्द केले. लाभार्थ्यामध्ये केमिकल इंजिनिअरिंगचे तीन, सिव्हिल इंजिनिअरिंगचे दोन व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन इंजीनिअरिंगचे एक असे एकूण सहा विद्यार्थी आहेत. मागील दोन वर्षांमध्ये १२ विद्यार्थ्यांना शैक्षणिक फीसाठी मदत केली आहे.
रमणलाल स्मृती फाउंडेशनचे संचालक रोहन मणियार व पुनम साखरपे मणियार हे तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी, २००१ मध्ये अनुक्रमे केमिकल व सिव्हील इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली आहे. वैयक्तिक आयुष्यामध्ये यशाचे शिखर गाठले असून, आपले वडील स्वर्गीय रमणलाल मणियार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ फाउंडेशन ची स्थापना करून समाजातील शिक्षण व आरोग्य क्षेत्रात विविध उपक्रम राबविले जातात. यातून समाजाप्रती प्रेम दिसून येते. आमच्या शिक्षण संकुलातील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी म्हणून आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान आहे असे गौरवोद्गार वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष अध्यक्ष, आमदार विनय कोरे यांनी काढले. वारणा शिक्षण मंडळ चे कार्यकारी अधिकारी डॉ.व्ही.व्ही.कारजिन्नी, अधिष्ठाता डॉ.एस एम पीसे, प्राचार्य डॉ. डी. एन. माने यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास विभागाचे सहयोगी अधिष्ठाता, प्रा.संपतराव मोरे यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले.