राजू शेट्टी हे स्टंटबाज आंदोलक, सतेज पाटलांनी माझ्या मंत्रीपदाची काळजी करू नये - आमदार राजेश क्षीरसागर
schedule04 Sep 26 person by visibility 34 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी पुन्हा निशाणा साधला. शक्तिपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ असलेल्या शेतकऱ्यांसोबत आमदार क्षीरसागर यांनी बैठक घेतली. या बैठकीमध्ये शक्तिपीठ महामार्गाची आवश्यकता, त्याचे संभाव्य फायदे तसेच प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार नसल्याची भूमिका आमदार क्षीरसागर यांनी स्पष्ट केली.
यावेळी पत्रकारांशी बोलताना, क्षीरसागर यांनी, ‘‘ शेट्टी हे स्टंटबाज आंदोलक आहेत. आंदोलने कशी असावी, हे त्यांनी मला शिकवू नये. राजू शेट्टींनी स्वत:ला शेतकऱ्यांचे मालक समजू नये’असा टोला लगावला.
शक्तिपीठ महामार्ग हा राज्यातील विविध महत्त्वाच्या धार्मिक आणि पर्यटनस्थळांना जोडणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, या माध्यमातून वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होण्यासोबतच संबंधित भागाच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासाला चालना मिळू शकते, असे आमदार क्षीरसागर यांनी बैठकीत सांगितले. क्षीरसागर म्हणाले, ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेले बाळकडू घेवूनच सर्वसामान्य नागरिकांना, विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी भारतीय विद्यार्थी सेनेचा जिल्हाप्रमुख असताना, ऊस दरासाठीच्या आंदोलनात मी अग्रभागी होतो. त्यावेळी राजू शेट्टींना आंदोलन म्हणजे काय हे माहितही नसेल. आंदोलने कशी करावी आणि त्यातून नागरिकांना न्याय कसा द्यावा, हे समस्त कोल्हापूरवासियांनी पाहिले आहे. त्यामुळे स्टंटबाजीसाठी मॅनेज आंदोलने करणारे कोण आहेत हे जनतेने ओळखले असून त्यांना शेतकरीबांधवांनीच घरी बसविले आहे.’
‘शिवसेना ठाकरे पक्षाचे माजी जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांच्या पापाचा घडा भरला आहे. त्यांच्या वीस वादग्रस्त प्रकरणांची माहिती जिल्हा पोलिस प्रमुखांकडे देणार आहे.’असे क्षीरसागर यांनी सांगितले. तसेच त्यांनी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांचाही समाचार घेतला. ‘गृहराज्यमंत्री, पालकमंत्रीपदावर असताना. कोल्हापूर महापालिकेत सत्ता असताना सतेज पाटील यांनी कोल्हापूरसाठी काही केले नाही. संधी असताना काहीही न करू शकणाऱ्यांविषयी काय बोलावे ? त्यांनी माझ्या मंत्रीपदाची काळजी करू नये. ’असेही क्षीरसागर म्हणाले.
बैठकीसाठी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, दाजी हिंदुराव पाटील, युवराज हिंदुराव पाटील, नवनाथ पाटील, आबासो शामराव पाटील, रणजीत भिवा पाटील, नारायण बाबासो पाटील, सुरेश रामा पाटील, सरदार आनंदा पाटील, संदीप शामराव जाधव, संदीप वसंत शिंदे, उत्तम निवृत्ती शिंदे, शैलेश कृष्णा शिंदे, सरदार आनंद शिंदे, पांडुरंग निवृत्ती शिंदे, मारुती काटकर, बाजीराव महादेव केम्बळे, खंडेराव काटकर, विश्वास रामा पाटील, सुखदेव शामराव पाटील, कमलाकर जगदाळे, सुनील जाधव उपस्थित होते.