शक्तीपीठ महामार्गावरुन राजू शेट्टी -राजेश क्षीरसागर समर्थक भिडले रस्त्यावर
schedule04 Sep 26 person by visibility 48 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या विरोध व समर्थानावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी व कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांचे समर्थक गुरुवारी, कोल्हापुरात एकमेकांना भिडले. कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी चौक येथील आंदोलनादरम्यान या दोन्ही नेत्यांच्या समर्थकांत राडा झाला. शक्तीपीठ महामार्गाला विरोध करत असलेल्या राजू शेट्टी यांच्याविषयी आमदार क्षीरसागर यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ स्वाभिमानीचे कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी चौक येथे आंदोलन केले. त्या आंदोलनाला प्रत्युत्तर देण्यासाठी जमलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यानी, स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांच्या वाहनावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. क्षीरसागर समर्थकांनी शेट्टुी समर्थकांच्या वाहनावर लाथा, बुक्क्यांनी हल्याचा प्रयत्न केला. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांच्या घोषणांनी, हल्ल्याच्या प्रयत्नांनी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. तणावाची स्थिती निर्माण होऊन नागरिकांची पळापळ झाली. पोलिसांनी हस्तक्षेप करत स्थिती नियंत्रणात आणली.
शक्तीपीठ महामार्ग करण्याचा प्रयत्न झाला तर रक्ताचे पाट वाहतील असा इशारा माजी खासदार शेट्टी यांनी दिला होता. शेट्टी यांच्या या वक्तव्याचा आमदार क्षीरसागर यांनी समाचार घेत ‘मनात आणलं तर सरकार उलटे टांगून ठेवू शकते’ असे जोरदार उत्तर दिले. या दोन्ही नेत्यांच्या वाकयुद्धाने गेले काही दिवस वातावरण ढवळले. शेट्टी यांच्या कार्यकर्त्यांनीही आमदार क्षीरसागर यांच्या विरोधात आंदोलने केली. तर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी छत्रपती शिवाजी चौकात माजी खासदार शेट्टी यांच्या फोटोला जोडे मार आंदोलन केले. त्याला उत्तर म्हणून स्वाभिमानीचे स्वस्तिक पाटील, राजेंद्र गडयान्नावर, अजित पोवार यांच्यासह कार्यकर्ते गुरुवारी, शिवाजी चौकात आंदोलनासाठी उतरले. त्यांनी क्षीरसागर यांच्या विरोधात घोषणा दिल्या. क्षीरसागर यांच्या फोटोला जोडे मार आंदोलन केले.
स्वाभिमानीचे कार्यकर्ते आंदोलन संपवून परत जात असताना पापाची तिकटीकडून शिवसेनेचे कार्यकर्ते मोठया संख्येने शिवाजी चौकाकडे येत होते. माळकर तिकटी जवळ त्यांनी, स्वाभिमानी कार्यकर्त्यांच्या वाहनावर लाथा, बुक्क्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तसेच वाहनांचा पाठलाग केला. स्वाभिमानीचे काही कार्यकर्ते शिवाजी चौकात थांबून होते. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तिकडे मोर्चा वळविला.शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, शहरप्रमुख रणजित जाधव, सुनील जाधव यांच्यासह अन्य कार्यकर्ते आंदोलनात होते. पोलिसांनी शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. तसेच स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यानाही पोलिसांनी ताब्यात घेत अन्यत्र हलविले