पन्हाळा नगरपरिषदचे सुपर स्वच्छ लीगमध्ये देशपातळीवर यश, राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव
schedule17 Jul 25 person by visibility 36 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : : स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५ च्या 'सुपर स्वच्छ लीग' विशेष श्रेणीत पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषदने यश मिळविले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विज्ञान भवन, दिल्ली येथे गुरुवारी (१७ जुलै) गौरव करण्यात आला. हा पुरस्कार नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पालिकेचे मुख्याधिकारी चेतनकुमार माळी आणि पाणीपुरवठा अभियंता प्रिया तारळेकर यांनी स्विकारला.
कचरामुक्त आणि हगणदारीमुक्त शहर यांसारख्या विविध घटकांमध्ये पन्हाळा शहराने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे पन्हाळ्याने देशात स्वच्छतेचा एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. शहराने केवळ स्वच्छता राखली नाही, तर देशपातळीवर मापदंड बनविला आहे. सर्व लोकप्रतिनिधी, शहरातील नागरिक, पन्हाळा नगरपरिषद प्रशासन, अधिकारी, कर्मचारी यांचे अथक प्रयत्न व सातत्यपूर्ण सहकार्य हे या यशामागील मुख्य कारण आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा सहआयुक्त नागेंद्र मुतकेकर, पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी चेतनकुमार माळी यांच्या नेतृत्वाखाली पन्हाळा नगरपरिषदेच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचा या यशात समावेश आहे
…………..
स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५ मध्ये 'सुपर स्वच्छ लीग' ही एक नवी आणि महत्त्वपूर्ण श्रेणी समाविष्ट करण्यात आली होती. मागील तीन वर्षांत स्वच्छतेमध्ये सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या निवडक शहरांसाठी ही श्रेणी सुरु करण्यात आली होती. या 'लीग' मध्ये आपले स्थान टिकवण्यासाठी किमान ८५ टक्के गुण मिळणे आवश्यक होते. पन्हाळा शहराने हे आव्हान यशस्वीरीत्या पूर्ण करत ८५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून आपले स्थान बळकट केले.