कौस्तुभने निवडणूक जिंकली…आजोबा आनंदाने नाचले ! बापाच्या डोळयात अश्रू तरळले !!
schedule28 Oct 26 person by visibility 345 categoryशैक्षणिक
आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन : मोठया चुरशीने झालेले मतदान आणि वाढलेला मतदानाचा टक्का… मातब्बर मंडळी मैदानात… आपसूकच निकालाविषयी वाढलेली उत्कंठा… निकाल काय लागणार म्हणून वाढलेली धाकधूक मतमोजणीला प्रारंभ झाल्यानंतर तब्बल चोवीस तासहून अधिक काळ लांबलेली प्रतिक्षा...बुधवारी दुपारी पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांना निर्णायक आघाडी मिळाल्याचे आकडे समोर येताच ‘विवेकानंद शिक्षण संस्था’परिवाराचा आनंद गगनात मावेना.कोल्हापुरात विवेकानंद शिक्षण संस्थेच्या परिसरात गुलालाची उधळण सुरू झाली. ‘शिक्षकांना आवडे….कौस्तुभ गावडे’अशा घोषणा देत काहींनी फेर धरत आनंदोत्सव साजरा केला. शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारीही जल्लोषात सहभागी झाले. तिकडे पुण्यात मतमोजणी केंद्र परिसरात वेगळे चित्र होते. नातवाच्या विजयाने आजोबा व विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे आनंदाने नाचू लागला. उपस्थितांच्यासोबत हात उंचावत जल्लोष केला. तर मुलाच्या यशाने वडील मुरलीधर गावडे यांना गहिवरुन आले. डबडबडलेल्या डोळयांनी आणि मनात आठवणी साठवत त्यांनी, ’हे यश पाहण्यासाठी आज कौस्तुभची आई हवी होती.’असे भावोद्गगार काढले आणि क्षणात या साऱ्या प्रसंगाला भावनिक किनार लाभली.
विवेकानंद शिक्षण संस्थेच्या दिवंगत सचिव प्राचार्या शुभांगी गावडे यांच्या आठवणीनी साऱ्यांच्याच डोळयांच्या कडा ओलावल्या. मुरलीधर गावडे यांनी अश्रू आवरत मुलाच्या विजयाबद्दल साऱ्यांचे आभार मानले. ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कौस्तुभ गावडे यांच्यावर विश्वास दाखविला. शिक्षक मतदारसंघातून महायुतीची उमेदवारी दिली. कौस्तुभच्या विजयात महायुतीच्या नेतेमंडळींसह साऱ्यांचाच वाटा आहे. कौस्तुभ गेली तीन, चार वर्षे तयारी करत होता. शिक्षकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी पाठपुरावा करत होता. आंदोलनात आघाडीवर होता. शिक्षकांनी साथ दिली. तरुण वयात आमदार झाला. तरुण वयात नेतृत्व दिले. तो, निश्चितच शिक्षकांना न्याय मिळवून देईल. हे यश पाहण्यासाठी कौस्तुभची आई हवी होती.’हे सांगतान त्यांचा कंठ दाठून आला.
वयाच्या तिसाव्या वर्षी कौस्तुभ गावडे आमदार झाले. शिक्षक मतदारसंघातील तरुण आमदार म्हणून त्यांची वेगळी नोंद होईल. शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे यांच्या विचाकार्याचा व संस्था कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या संस्काराची रुजूवात कौस्तुभवर झालेली. संस्थेची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून वेगळी छाप पाडलेली. साळुंखे कुटुंबीयांतील सदस्य पहिल्यांदाच शिक्षक मतदारसंघातील मैदानात उतरलेला. संस्था कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांचे ते नातू. निवडणूक जाहीर झाली आणि कौस्तुभच्या प्रचारासाठी प्राचार्य अभयकुमार मैदानात उतरले. त्यांनी वयाची ८० ओलांडलेली. मात्र निवडणुकीच्या नियोजनात कुठेही कमतरता राहणार नाही याकडे लक्ष दिले. स्वत प्रचारासाठी फिरले. कोल्हापूर, सांगलीसह मतदारसंघाचा दौरा केला. पाचही जिल्हयातील संस्थाचालक, शिक्षक मतदारांशी संवाद साधला. विवेकानंद शिक्षण संस्थेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना ते, ‘गुरुदेव – कार्यकर्ते’म्हणून संबोधतात. संस्थेतील शिक्षक असो की कर्मचारी, प्रत्येकाला त्यांच्याबद्दल आदराची भावना. शिक्षक मतदारसंघाची मतमोजणीची प्रक्रिया बालेवाडी क्रीडा संकुल येथे. प्राचार्य अभयकुमार साळुंखे हे मंगळवारी पुण्याला रवाना झाले. बुधवारी सकाळपासूनच ते मतदान केंद्र परिसरात थांबून होते. कौस्तुभ गावडेंचा विजय निश्चित झाल्यांनतर त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. उपस्थित मंडळीसोबत हात उंचावत त्यांनी काही काळ जल्लोष केला. ते आनंदाने नाचले सुद्धा. ते पाहून उपस्थित मंडळींनी ठेका धरला.
……………….
‘शिक्षकांनी मोठा विश्वास दाखवित कौस्तुभ गावडे यांना निवडून दिले. ते, तरुण आमदार ठरले आहेत. त्यांना शैक्षणिक कार्याचा वारसा लाभला आहे. त्यांना शिक्षकांच्या समस्या माहित आहेत. ते नक्कीच शिक्षकांना न्याय हक्क मिळवून देतील.
- मयुरी गावडे