गोकुळच्या राजकारणात शिवसेना ‘मधला भाऊ’! करवीरमध्ये विश्वास पाटील व आमच्याकडे ७७५ ठराव! !
schedule18 Sep 26 person by visibility 85 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : ‘गोकुळच्या निवडणुकीच्या निमित्ताने ठरावावरुन महायुतीत मोठा भाऊ, छोटा भाऊ अशी चर्चा आहे. मात्र शिवसेनेकडे १३०० हून अधिक ठराव आहेत. करवीर तालुक्यात गोकुळचे माजी चेअरमन विश्वास पाटील व आपल्याकडे मिळून ७७५ ठराव आहेत. त्याकडे काही जण दुर्लक्ष करतात. महायुतीमध्ये गोकुळच्या राजकारणात शिवसेना हा मधला भाऊ आहे ’ अशा शब्दांत करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांनी जागा वाटपासंबंधी गुगली टाकली.
गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शिवसेनेतर्फे इच्छुक उमेदवारांनी गुरुवारी, १७ सप्टेंबर २०२६ रोजी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यानिमित्त आमदार नरके हे रमणमळा येथील शासकीय बहुउद्देशीय हॉल येथे आले होते. याप्रसंगी पत्रकारांशी बोलत होते.गोकुळच्या निवडणुकीवरुन गेले महिना दीड महिना आरोप, प्रत्यारोप सुरू आहेत. अदृश्य शक्तीचा उल्लेख होता. यासंदर्भात नरके यांच्याकडे विचारणा केली असता, ‘निवडणुकीपूर्वी काही गोष्टीवरुन मतभेद झाले असतील. पण आता महायुतीत कसलेही मतभेद नाहीत. अदृश्य शक्तीवरुन मतभेद संपले आहेत. महायुती म्हणून आम्ही सगळे एकत्र निवडणूक लढवित आहेत. पक्षीय पातळीवर आता कसलेही मतभेद असू नयेत.’
‘गोकुळच्या निवडणुकीसंबंधी प्राथमिक चर्चा झाली आहे. कोणाचे ठराव किती, यासंबंधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांना प्राथमिक माहिती दिली आहे. येत्या काही दिवसात जागा वाटपासंबंधी चर्चा होऊन सारे काही सुरळीत होईल. पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धैर्यशील माने, माजी खासदार संजय मंडलिक व आपल्याकडे मिळून १३०० हून अधिक ठराव आहेत. गोकुळच्या राजकारणात आम्ही ‘मधला भाऊ’ आहोत.’असे आमदार नरके यांनी सांगितले.