पालकमंत्र्यांनी घेतला जिल्हा परिषदेच्या कामांचा आढावा, विभागप्रमुखांकडून कामांचे सादरीकरण
schedule26 May 25 person by visibility 568 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : केंद्र व राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजना जिल्हा परिषदेंतर्गत राबविण्यात येत असतात. सूक्ष्म नियोजन करुन जिल्हा परिषदेच्या योजना अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यत पोहोचवा, असे आदेश पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. या बैठकीत विभागप्रमुखांनी आपआपल्या विभागांच्या कामांचे सादरीकरण केले.
पालकमंत्री आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या सभागृहात सोमवारी (२६ मे २०२५) आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुध्द पिंपळे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील, मुख्य वित्त व लेखा अधिकारी अतुल आकुर्डे, बांधकाम विभागाचे सचिन सांगावकर, जल जीवन मिशन विभागाच्या माधुरी परीट यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
जिल्हा परिषदेंतर्गत ५० हजार घरकुल वाटप करण्यात येणार आहे. घरकुल योजनेचे लाभ जिल्ह्यातील लाभार्थ्यांना द्यावा. दिव्यांगांचे प्रश्न वेळेत मार्गी लावा. जिल्हा परिषदेअंतर्गत शाळांमध्ये तसेच विविध विभागात खरेदी करण्यात येणाऱ्या वस्तू व उपकरणांची देखभाल दुरुस्ती वेळोवेळी करावी. पाणीपुरवठा आणि स्वच्छतेचे काम चांगल्या प्रकारे होत आहे. दूषित पाण्यापासून लोकांना आजार उद्भवत असल्याने ग्रामपंचायतींनी पाणी शुद्धीकरण करुन घ्यावे. याबाबत आरोग्य व पाणीपुरवठा विभागांने समन्वयाने कामकाज करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
राजीव गांधी प्रशिक्षण अभियानांतर्गत गावाचा विकास होण्यासाठी गावातील पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणाच्या माध्यमातून गावांच्या विकासामध्ये योगदान देता येईल. जिल्हा परिषदेच्या शाळा राज्यात उत्कृष्ट असून जिल्हा परिषदेच्या विविध नाविण्यपूर्ण उपक्रमांतर्गत विद्यार्थी प्रगती साधतील. पशुसंवर्धन विभाग जिल्ह्यात विविध उपक्रम राबवून चांगल्या प्रकारे कामकाज करत आहे. विविध विभागांमध्ये उत्कृष्ट काम करुन कोल्हापूर जिल्हा परिषद आणि कोल्हापूर जिल्हा राज्यात सर्व बाबतीत अग्रेसर म्हणून जिल्ह्याची ओळख निर्माण करुया, असेही ते म्हणाले. सुरुवातीस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी जिल्हा परिषदेंतर्गत असलेल्या विभागांची माहिती दिली.