Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जिप शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी डॉक्टरांची मासिक भेट; स्पर्धा परीक्षा तयारीसाठी दर शनिवारी विशेष मार्गदर्शनडीवाय पाटील पॉलिटेक्निकचे यश कौतुकास्पद : ऋतुराज पाटीलएकल महिलांसाठी विशेष सर्वेक्षण; नगरसेविका मंगल साळोखे यांचा पुढाकारशिवाजी विद्यापीठातर्फे गुणवंत शिक्षक - प्रशासकीय सेवक पुरस्कारांची घोषणा, बुधवारी वितरण समारंभपंडित उल्हास कशाळकर, युवा पखवाजवादक कृष्णा साळुंखेंना गुणीदास पुरस्कार ! सहा डिसेंबरला वितरण समारंभ !!भलेबहाद्दर नगरसेवक....लक्ष्य गांधीनगरवर ! निशाणा प्रशासनावर !!अगोदर निधी…मग सभा ! महापालिका सभेत नगरसेवकांची प्रशासनावर आगपाखड!!जिल्हा परिषदेत असमान निधी वाटप, काँग्रेसच्या सदस्यांचे शुक्रवारी लाक्षणिक उपोषण ! विकासकामे रखडली, सदस्यांचे आरोग्य बिघडण्याची वेळ ! !आरोग्य सेवेवर एआयचा वॉच, कोल्हापूर जिल्ह्यात पायलट प्रोजेक्ट !आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकल्पाचे उद्घाटन ! !केआयटीला आयएसटीईचे दोन मानाचे पुरस्कार 

जाहिरात

 

भलेबहाद्दर नगरसेवक....लक्ष्य गांधीनगरवर ! निशाणा प्रशासनावर !!

schedule17 Nov 26 person by visibility 436 categoryलाइफस्टाइलमहानगरपालिका

आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन -: महापालिका निवडणुका होऊन जवळपास दहा महिन्याचा कालावधी उलटला. केंद्रात महायुती, राज्यात महायुती…आणि महापालिकेत महायुतीची सत्ता…‘विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही…शेकडो कोटीचा निधी शहरासाठी उपलब्ध झाला, महापालिकेला निधीची अडचण भासणार नाही’ अशी ग्वाही मंत्र्यांच्यापासून आमदारांपर्यंत सारेच देत आहेत. एकीकडे विकासाचे चित्र रंगविले जात असताना दुसरीकडे महापालिकेत महायुतीचे पदाधिकारी, नगरसेवकांनी ‘महापालिकेच्या स्वनिधीतून प्रशासनाने विकासकामांना निधी उपलब्ध केला नाही, विकासकामे रखडली’म्हणत सर्वसाधारण सभा तहकूब केली. प्रशासनाकडे बोट दाखविताना त्याची दिशा सरकारकडे सरकते याचे भानही महायुतीच्या मंडळींना नव्हते. प्रशासनावर आगपाखड करण्यात विरोधी महाविकास आघाडीपेक्षा सत्ताधारी महायुतीचेच सदस्य पुढे होते. तर विरोधी महाविकास आघाडी अर्थात काँग्रेसनेही, तावडे हॉटेल प्रकरणी आवाज उठविण्याऐवजी ‘सत्ताधाऱ्यांच्या सुरात सूर’ मिसळत नगरसेवक म्हणून आम्ही काही वेगळे नाही हेच दाखवून दिले. दोघांचा निशाणा प्रशासनावर असला तरी त्यांचे लक्ष्य ‘गांधीनगर…होते हे मात्र शहरवासियांच्या पक्के लक्षात आले.

एखादा विषय इंटरेस्टचा असेल तर मतभेद विसरुन सगळे एकवटतात, साऱ्यांच्या फायद्याचा निर्णय होतो…हे सोमवारी, सोळा नोव्हेंबर २०२६ रोजी झालेल्य सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने शहरवासियांना पाहावयास मिळाले. मुळात सोमवारी होणारी सर्वसाधारण सभा ही विलंबाने होत होती. शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे लांबणीवर पडलेली ही सभा होती. सभेसमोर विषयांची जंत्री होती. यामध्ये तावडे हॉटेल ते गांधीनगर रोडवरील अनधिकृत बांधकामासंबंधीचा विषय होता. या अनधिकृत बांधकामासंबंधी हायकोर्टातील सुनावणी निर्णय आणि सरकारचे आदेश यासंदर्भातील वस्तुस्थिती अहवाल प्रशासन सभागृहासमोर मांडणार होते.

१५८ एकर जागा, त्यावरील दोनशेहून अधिक बांधकामे नियमितकरणाचा हा विषय. तावडे हॉटेल ते गांधीनगर रोडवरील ही जागा कोणाच्या मालकीची यासाठी सुप्रीम कोर्टापर्यंत न्यायालयीन लढाई महापालिकेने लढलेली. सुप्रीम कोर्टाने ही जागा महापालिकेच्या मालकीची असल्याचा निकाल दिला. जागा महापालिकेची झाली, पण अनधिकृत बांधकामाबाबत काय हा निर्णय अद्यापही प्रलंबित आहे. दुसरीकडे या जागेवरील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याच्या पडद्याआड हालचाली सुरू आहेत. राज्य सरकारनेही हिरवा कंदील दाखविला आहे. मात्र महापालिका सभागृहाची मान्यता त्यासाठी महत्वाची. यातील बहुतांश बांधकामे व्यापार वर्गातील. गांधीनगर बाजारपेठेशी संलग्न. भलीमोठी व्यापारी संकुले उभारलेली. बाजारपेठ आणि व्यापारी संकुल म्हटलं की अर्थकारण मोठे. व्होटबँकशी सोबत. यामुळे काही नेतेमंडळी पडद्यावर न येता ही सारी बांधकामे अधिकृत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. महापालिका सभागृहाची मंजुरी आवश्यक असल्याने साऱ्यांच्याच अपेक्षा उंचावल्या. कारभारी मंडळीही सरसावले. वाटाघाटी सुरू झाल्या. महापालिकेत सिनीअर आणि अभ्यासू नगरसेवक आहेत. पहिल्यांदाच प्रतिनिधीत्व करणारेही मोठया संख्येन आहेत. काहींना शहर विकासाची तळमळ. ते नागरी प्रश्न पोटतिडकींने सभागृहात प्रश्न मांडणारे.

दुसरीकडे काही जण ‘अडवा आणि जिरवा’ हा पॅटर्न राबविण्यात माहीर. सभागृहाचे वटमुख्यत्यारपत्र घेतल्यासारखे साऱ्या कामात त्यांचा हस्तक्षेप. कुठलाच पक्ष त्याला अपवाद नाही. प्रत्येक पक्षात अशी मंडळी. जणू काही ते ज्या त्या आघाडीचे म्होरकेच. ‘ सोमवारी, महापालिका सभा तहकूब करण्यामागे सुद्धा मोठा ‘अर्थ’ दडला आहे समाधानकारक वाटाघाटी न झाल्यामुळे तावडे हॉटेलचा विषय सभागृहासमोर येऊ द्यायचा नाही. विषय पेडिंग ठेवून भाव वधारण्याचा चलाख डाव यानिमित्ताने खेळला’ अशी उघड चर्चा होत शहरात सुरू आहे. यामुळे सभागृहाचे कामकाज काही मिनिटात संपविण्याचा प्लॅन आखला. निमित्त साधले, स्वनिधीचे. फेअरडीलचे. फेअरडील प्रश्नी प्रशासनाने सभागृहाला विश्वासात घ्यायला हवे होते. चर्चा करायला हवी होती. मात्र महापालिका प्रशासनातही काही अधिकारी शहरहितापेक्षा स्वहित:ला प्राधान्य देणारे आहेत. प्रशासनातही काही जण ‘आम्ही म्हणू तीच पूर्वदिशा’या पद्धतीने गाडा हाकत आहेत.  

 दुसरीकडे महापालिका निवडणूक होऊन दहा महिन्याचा कालावधी उलटला, विकासकामांसाठी निधी उपलब्ध होत नसेल तर जितके प्रशासन दोषी तितके राज्यकर्ते देखील जबाबदार. महापालिकेची सारी भिस्त सध्या जीएसटी अनुदानावर आणि विकासकामांसाठी उपलब्ध होणाऱ्या केंद्र आणि राज्य सरकारच्या फंडावर. महापालिकेचे उत्पन्नाचे स्त्रोत कमी असल्यामुळे स्वनिधीवर मर्यादा पडलेल्या. यामुळे निधीसाठी आरडाओरड ही काही नवीन बाब नाही. मात्र सभा तहकूब करुन संपूर्ण दोष प्रशासनावर ठेवायचा हा सारा प्रकार संभ्रमावस्था निर्माण करणारा आहे. कारण महायुतीचे नेतेमंडळी विविध विकासकामांसाठी कोटयवधी निधी आणल्याची जाहिरातबाजी करतात. आणि दुसरीकडे महायुतीचे नगरसेवक प्रशासनाविरोधात महापालिका चौकात उतरतात. एक दमडीही निधी मिळाला नाही असे सांगतात. मग खरे कोणाचे मानायचे…कोटयवधी निधी आणला असे सांगणाऱ्या महायुतीच्या नेत्यांचे की निधी नाही तर सभा नाही अशी भूमिका घेणाऱ्या महायुतीच्या नगरसेवकांचे असा प्रश्न आता शहरवासियांना पडत आहे. तावडे हॉटेल ते गांधीनगर मार्गावरील अनधिकृत बांधकामे हटवावीत यासाठी राणाभीमदेवी थाटात भाषण करणारे सर्वपक्षातील प्रमुख नगरसेवक आता सभागृहात हा विषय ‘तारीख पे तारीख’करत आहेत. त्यामागे कसला ‘अर्थ’ दडला आहे हे शहरवासिय मात्र जाणून आहेत.

…………….

महाविकास आघाडीच्या नगरसेवकांची भूमिका सत्ताधाऱ्यांना पूरक…

महापालिकेत महायुती आणि महाविकास आघाडीतील कुरघोडीचे राजकारण टोकाचे आहे. सभागृहातील विषयातही ते दिसते. मात्र सोमवारी, सभा तहकूब करुन तावडे हॉटेल बांधकाम प्रकरणी सोयीची भूमिका घेण्यात महाविकास आघाडीचे नगरसेवकही महायुतीच्या नगरसेवकाच्या हो ला हो म्हणत असल्याचे चित्र दिसले. वास्तविक विरोधी आघाडी म्हणून तावडे हॉटेल प्रकरणी सभागृहात व बाहेर ही आवाज उठविता आला असता. मात्र  काँग्रेसने हे वेगळेपण सिद्ध करण्याची आयती संधी दवडली. काँग्रेसचे नेते व आमदार सतेज पाटील हे गोकुळमधील राजकारणावरुन एकाकी लढा देत सत्ताधाऱ्यांना आव्हान देत असताना दुसरीकडे महाविकास आघाडीचे नगरसेवक मात्र तावडे हॉटेल बांधकाम प्रकरणी सत्ताधाऱ्यांना पूरक भूमिका घेत आहेत अशी भावना शहरवासियांची बनली आहे. महाविकास आघाडीकडे कायद्याची जाण असणारे, महापालिकेतील नियमांचा अभ्यास असणारे, सभागृ़ह गाजविणारे सदस्य काही कमी नाहीत. या प्रकरणी त्यांनी, सभागृहात आवाज उठवत यंत्रणेला ‘सळो की पळो’करुन सोडले असते तर नगरसेवक म्हणून वेगळी ओळख निर्माण झाली असती.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes