कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्तपदी कादंबरी बलकवडे, डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांची बदली
schedule08 Oct 20 person by visibility 3690 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांची बदली झाली आहे. त्यांच्या बदलीमुळे रिक्त आयुक्तपदाच्या जागेवर गोंदियाच्या जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांची नियुक्ती झाली आहे. बलकवडे यांनी गुरुवारी सायंकाळी डॉ. कलशेट्टी यांच्याकडून पदभार स्वीकारला. दरम्यान कलशेट्टी यांच्या बदलीचे ठिकाण अजून कळविले नाही.
कलशेट्टी यांच्या बदलीचा आदेश गुरुवारी दुपारी निघाला. कलशेट्टी यांनी कोल्हापुरात आयुक्त म्हणून काम करताना प्रशासनाला सामाजिक चेहरा देण्याचा प्रयत्न केला. आयुक्त म्हणून रुजू झाल्यापासून त्यांनी प्रत्येक रविवारी कोल्हापूर आणि परिसरात स्वच्छता मोहिम राबवली. महापालिकेचे कर्मचारी, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना यांना सोबतीला घेऊन स्वच्छता मोहिमेला गती दिली. त्यांनी ‘स्वच्छतादूत’म्हणून ओळख निर्माण केली. दर रविवारी होणाऱ्या स्वच्छता अभियानाचा नुकताच अमृतमहोत्सवी आठवडा साजरा करण्यात आला.
कादंबरी बलकवडे या २०१० मधील आयएएस बॅचच्या अधिकारी आहेत. २०१० ते २०१५ या कालावधीत त्या नागालँड येथे कार्यरत होत्या. २०१५ ते २०१६ या कालावधीत त्यांनी नागपुरात अतिरिक्त जिल्हाधिकारी तर २०१६ ते २०१८ या कालावधीत नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर काम केले. २०१८ पासून त्या गोंदियाच्या जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होत्या.
कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या त्या पत्नी आहेत.
……….
महापालिका प्रशासन गतीमान, पारदर्शक-लोकाभिमुख करू
कांदबरी बलकवडे यांनी गुरुवारी सायंकाळी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यावेळी बलकवडे म्हणाल्या, ‘कोल्हापूर ही ऐतिहासिक नगरी आहे.या नगरीत काम करण्याची संधी मिळते हे माझ्या दृष्टीने भाग्याचे आहे. महानगरपालिकेच्या माध्यमातून अधिक चांगले काम करुन राज्यातील एक आदर्श महापालिका म्हणून लौकिक कायम राखू. कायद्याच्या चौकटीत आणि पारदर्शक कामकाजाला प्राधान्य राहील. कोल्हापूर महानगरपालिका प्रशासन अधिक गतीमान, पारदर्शक व लोकाभिमुख करू. ’