सांगलीत भाजप चितपट, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष- उपाध्यक्षपदी महाविकास आघाडी विजयी !
schedule18 Mar 26 person by visibility 140 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : सांगली जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष कोणाचा होणार महायुतीचा की महाविकास आघाडीचा गेले महिनाभर रंगलेल्या काही खेळात महाविकास आघाडीने अखेर बाजी मारली. बुधवारी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष -उपाध्यक्षपदासाठी निवड सभा झाली. यामध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सदस्य संगीता पाटील यांनी महायुतीतील भाजपच्या सदस्या स्वप्नाली मासाळ यांचा 34 विरुद्ध 25 मतांनी परराभव केला. उपाध्यक्षपदाची लढत महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार ऋषिकेश लाड व महायुतीचे उमेदवार हिम्मत जाधव यांच्यामध्ये झाली. यामध्ये लाड यांनी जाधव यांचा 34 विरुद्ध 25 इतक्या मतांनी पराभव केला. महाविकास आघाडीने जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला चितपट केल्याची चर्चा निकालानंतर सुरू झाली. अध्यक्ष व उपाध्यक्षपदावरून गेले महिनाभर महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू होते. 61 सभासद संख्या असलेल्या सांगली जिल्हा परिषदेमध्ये कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. महायुतीमध्ये विसंवाद होता. निवडणुकीच्या कालावधीत ही महायुतीमधील नेते मंडळी एकमेकांच्यावर आरोप प्रत्यारोपांच्या तोफा डागत होते. परिणामी दुभंगलेली मने एकसंध झाली नाहीत. भारतीय जनता पक्षाचे नेते व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपचा अध्यक्ष होणार अशी घोषणा केली होती. महाविकास आघाडीचे नेते आमदार जयंत पाटील, आमदार विश्वजीत कदम व खासदार विशाल पाटील यांनी एकत्रितपणे अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी मोट बांधली होती. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीसाठी शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय खेळी सुरू होत्या. मुख्यमंत्र्यांनीही जिल्ह्यातील नेत्यांना फोन केले होते. पण बहुमताचे मॅजिक फिगर गाठण्यात भारतीय जनता पक्ष अपयशी ठरला. महाविकास आघाडीने एकत्रित खेळी करत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपला धोबीपछाड दिले. शिवसेनेचे दोन जिल्हा परिषद सदस्य अध्यक्ष उपाध्यक्ष निवडी दरम्यान गैरहजर राहिले. यावरून महायुतीमध्ये सारे काही आलबेल नाही हे स्पष्ट झाले.