आयटी असोसिएशनचा अनोखा संकल्प ! तोपर्यंत नो फेटा…नो सत्कार ! !
schedule25 Apr 26 person by visibility 38 categoryउद्योग
आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन : कोल्हापुरात अद्ययावत आयटी पार्क हे साऱ्यांचेच स्वप्नं. जवळपास दोन दशकं त्यासाठी अनेकांनी विविध पातळीवर प्रयत्न केलेला. आयटी असोसिएशनचा पाठपुरावा, लोकप्रतिनिधींची सरकारी पातळीवरील मदत, राज्याच्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे सहकार्य यामुळे कोल्हापुरातील आयटी पार्कसाठी शंभर एकर जागा मंजूर झाली आहे. राज्य सरकारने आयटी पार्कसाठी जागा मंजूर केल्यानंतर आयटी असोसिएशनने स्वागत करुन अधिकारी, लोकप्रतिनिधीप्रती कृतज्ञता व्यक्त केली. मात्र त्याचवेळी, आयटी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी, ‘आम्हा सगळयांना भक्कम पायाभूत सुविधा द्या, कोल्हापूरला राज्यातील सर्वात मोठी आयटी इकॉनॉमी इंडस्ट्रीज बनवू.’या शब्दांत साऱ्यांना आश्वस्त केले. तसेच कोल्हापुरातील आयटी पार्कचे उदघाटन झाल्याशिवाय सत्कार स्वीकारणार नाही…फेटाही बांधणार नाही’असा संकल्प केला आहे.
‘कोल्हापुरात सध्या ५१७ आयटी कंपन्या आहेत. २०१० मध्ये कोल्हापुरातील आयटी कंपन्यांची संख्या ५६ इतकी होती. त्यावेळी आयटीमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांची संख्या १२०० होती. आता पाचशेहून अधिक आयटी कंपन्यातील कर्मचाऱ्यांची संख्या अकरा हजार इतकी आहे २०३५ मध्ये कोल्हापुरात २५०० आयटी कंपन्या असतील आणि त्यावेळी ७० हजार कर्मचाऱ्यांना संधी असेल. स्थानिक आयटी कंपन्या हीच खरी ग्रोथ इंजिन आहे. कोल्हापुरातील आयटी व्यावसायिकांचे वैशिष्ट म्हणजे, कोणत्याही सरकारी मदतीशिवाय या कंपन्या कार्यरत आहेत. शिवाय आयटी एक्सपोर्टमध्ये कोल्हापूर हे राज्यात तृतीय क्रमांकावर आहे.’ कोल्हापूरच्या आयटी क्षेत्राचा हा चढता आलेख आयटी असोसिएशनचे अध्यक्ष प्रताप पाटील व सचिव राहूल मेंच यांनी मांडला.
सरकारने आता आयटी पार्कसाठी जागा मंजूर केल्यामुळे कोल्हापूरकरांच्या आशा आणखी उंचावल्या आहेत. कोल्हापुरात आयटी पार्कसाठी पोषक वातावरण आहे. जागा मंजुरीनंतर आता साऱ्यांना प्रतिक्षा लागून राहिलीय ती प्रत्यक्षातील आयटी पार्कची. आयटी पार्क साकारण्यासाठी साऱ्यांचेच प्रयत्न सुरू आहेत. आयटी असोसिएशन कोल्हापूरचे संस्थापक अध्यक्ष शांताराम सुर्वे, विद्यमान अध्यक्ष प्रताप पाटील, उपाध्यक्ष धवल चौगले, खजानिस रणजीत नार्वेकर, संचालक आदिनाथ पाटील, विश्वजीत देसाई, मंदार पेटकर, मनीष राजगोळकर, विनय गुप्ते, प्रसन्न कुलकर्णी, कैलास मेढे, स्नेहल बियाणी, नामदेव पाटील, अशी अनेक मंडळी त्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांनी आयटी पार्कसंबंधी सादरीकरण केले आहे. अधिकारी वर्गापासून लोकप्रतिनिधीपर्यंत पाठपुरावा करत आहेत. आयटी पार्कसाठी जागा मंजूर झाली हा आनंदाचा क्षण आहे, त्याचबरोबर सरकारने दिलेल्या जागेत आयटी पार्क साकारुन उद्घाटन झाल्याशिवाय सत्कार स्वीकारणार नाही…फेटा बांधणार नाही असा संकल्प त्यांनी केला आहे. आयटी पार्कसाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अधिकारी, लोकप्रतिनिधींचा आयटी असोसिएशनने सत्कार केला. मात्र आयटी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी स्वत सत्कार स्वीकारला नाही. आयटी पार्कच्या उद्घाटनवेळीच सत्कार स्वीकारणार हा त्यांचा संकल्प ध्येयपूर्तीची जाणीव करुन देणारा आहे.
कोल्हापुरात आयटी पार्कसाठी अनेक गोष्टी पोषक आहेत. ऑपरेशन आणि डेव्हलपमेंट खर्च किफायतशीर, शिवाजी विद्यापीठ आणि अग्रगण्य स्वायत्त संस्थामधून निर्माण होणारे कुशल मनुष्यबळ, सखोल तांत्रिक कौशल्य, या जमेच्या बाजू आहेत. यामुळे कोल्हापुरातील आयटी पार्कमध्ये स्थानिक व्यावसायिकांना शंभर टक्के आरक्षण व सवलतीच्या दरात भूखंड मिळावेत यासाठी असोसिएशन प्रयत्नशील आहे.
………………
आमदार, खासदार व मंत्र्यांचे सहकार्य
कोल्हापुरातील आयटी पार्कसाठी आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक हे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. क्षीरसागर यांनी शाश्वत विकास परिषदेत आयटी पार्कचा विषय अजेंडयावर आणला. विधानसभेत लक्षवेधी मांडली. पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ यांनीही सरकार दरबारी पाठपुरावा केला. खासदार धनंजय महाडिकांनी एअर कनेक्टिव्हिटी वाढवून आयटी पार्कसाठी गती दिली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांचे सहकार्य लाभले. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मदत झाल्याची कृतज्ञतेची भावना आयटी असोसिएशनचे पदाधिकारी व्यक्त करतात.