कळंबा तलावात कचरा, टाकाऊ वस्तू, खरमातीचा ढिगारा ! कळंबा -पाचगाव ग्रामपंचायतीचे पूर्णत: दुर्लक्ष!!
schedule04 Mar 26 person by visibility 76 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कळंबा आणि पाचगाववासियांसाठी हक्काचा पाणीसाठा असलेल्या कळंबा तलाव पात्रात खुलेआम कचरा, टाकाऊ वस्तू टाकली जात आहे. तलाव पात्रात ठिकठिकाणी खरमाती ओतून ढिगारे तयार केले आहेत. पावसाळया पाणी साचणाऱ्या तलाव पात्रातच हा सारा कचरा पडून आहे. मात्र कळंबा आणि पाचगाव ग्रामपंचायतीचे कळंबा तलावाच्या स्वच्छतेकडे पूर्णता दुर्लक्ष आहे. तसेच महापालिकेचे कामकाजही या तलावाशी काही संबंध नसल्यासारखा आहे. तलाव पात्रात कचरा टाकणाऱ्यावर कोणत्याही स्वरुपाची कारवाई कळंबा, पाचगाव ग्रामपंचायत व महापालिका प्रशासनाकडून होत नाही. हा परिसर स्वच्छ ठेवण्यासंदर्भात उपाययोजना होत नाहीत. कळंबा तलाव सुशोभिकरणासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. पण तलाव परिसर प्लास्टिक पिशव्या मुक्त असावा, कचरा टाकणाऱ्यावर निर्बंध लादावेत अशा पद्धतीने कारभार होताना दिसत नाही. सांडव्याला लागूनच तलाव पात्रात टाकाऊ साहित्य, खरमाती, कचऱ्याच्या भरलेल्या पिशव्या टाकल्या आहेत. प्लास्टिक पिशव्या आणि बाटल्या ठिकठिकाणी विखुरल्या आहेत. कचरा टाकणाऱ्यांवर कोणत्याही स्वरुपाची कारवाई होत नसल्यामुळे येथे खरमातीचे ढिगारे तयार झाले आहेत.