शिवसेना ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांचे अनोखे आंदोलन, मैदानावरील पाण्यात उधळल्या प्रतिकात्मक नोटा
schedule21 May 25 person by visibility 37 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवाजी पेठेतील गांधी मैदानाची दुरवस्था काही संपायची चिन्हे नाहीत. वळवाच्या पावसाने मैदानात पाणी साचले, पाण्याचा निचरा का होत नाही ? आणि मैदान दुरुस्तीसाठी आणलेला निधी गेला कुठे ? अशी विचारणा करत शिवसेना ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अनोखे आंदोलन केले. पावसाने साचलेल्या मैदानात प्रतिकात्मक नोटा उधळत महापालिका प्रशासनाचा निषेध केला. टक्केवारीवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा धिक्कार असो, महापालिकेचा एल्गार-पाच कोटी उधळणार अशा घोषणा दिल्या.
शहरप्रमुख रविकिरण इंगवले, सुनील मोदी, माजी नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे, रिमा देशपांडे, जाहिदा खान, धनाजी दळवी, दीपक गौड, रवी चौगुले, राजेंद्र जाधव, दिपाली शिंदे, शशिकांत बीडकर आदी उपस्थित होते. दरम्यान शहरप्रमुख रविकिरण इंगवले म्हणाले, ‘ गांधी मैदानाची दुरवस्था कधी संपणार ? गेल्या काही वर्षात गांधी मैदान येथे पावसाचे पाणी दहा-दहा दिवस साचत आहे. महापालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब वारंवार आणली. मात्र पाण्याचा निचरा होत नाही. गांधी मैदानसाठी पाच कोटीचा निधी आणला असे सांगतात, पण तो निधी कुठे खर्च झाला ? निधी कुठे गेला ? यासाठी हे आंदोलन आहे.’