नेते मंडळी म्हणतात, निवडणूक ताकतीने लढू अन् जिंकू !
schedule16 Dec 25 person by visibility 86 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महापालिका निवडणुकीच्या घोषित कार्यक्रमाचे साऱ्याच पक्षाच्या नेते मंडळींनी स्वागत केले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्येच ही निवडणूक होणार आहे. नेतेमंडळींनी निवडणुकीला तयार आहे. महापालिका निवडणूक ताकतीने लढू अन् आपणच जिंकू असा विश्वास व्यक्त केला आहे.
राष्ट्रवादीचे नेते व मंत्री हसन मुश्रीफ : महायुती म्हणणूच आम्ही निवडणूक लढविणार आहोत. दोन दिवसात जागा वाटपाचा निर्णय होणार आहे. नेतेमंडळीची प्राथमिक चर्चा झाली आहे. महायुती सरकार म्हणून जनहिताच्या योजना राबविल्या आहेत. कोल्हापुरात अद्ययावत विकास प्रकल्प राबविणे, नागरी हिताचा कामकाज याबाबींना प्राधान्य असेल.
खासदार धनंजय महाडिक : महायुतीला अतिशय पोषक वातावरण आहे. महायुती म्हणूनच आम्ही निवडणूक लढविणार आहोत. महायुती अंतर्गत लवकरच जागा वाटपाचा निर्णय होईल. महापौर हा महायुतीचा होईल. महापालिका निवडणुकीत भाजपचे अधिक नगरसेवक निवडून येतील. भाजपच्या मुलाखती पूर्ण झाल्या आहेत. महायुतीत मतभेद नाहीत.
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार राजेश क्षीरसागर : महायुती सरकारने कोल्हापूर शहरात विविध विकासकामे प्रभावीपणे केली आहेत. महायुतीवर लोकांचा विश्वास आहे. महायुती म्हणून निवडणूक लढवू आणि जिंकू. जागा वाटपही लवकरच होईल. शिवसेनेकडे इच्छुकांची संख्या जास्त आहे. अनेकांनी उमेदवारी मागितली आहे.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील : महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढविली जाणार आहे. घटक पक्षातील पदाधिकाऱ्यांची काँग्रेस समितीसोबत प्राथमिक चर्चा झाली आहे. काँग्रेसकडून निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांच्या मुलाखती मंगळवारी व बुधवारी होतील. त्यानंतर उमेदवारीवर शिक्कामोर्तब होईल. काँग्रेस कमिटी येथे मुलाखती होतील.
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष महापालिका निवडणूक ताकतीने लढविणार आहे. कोल्हापूर आणि इचलकरंजीसाठी इच्छुकांकडून उमेदवारी मागणी अर्ज सुरुवात केली आहे. प्रत्येक प्रभागात एक जागा राष्ट्रवादीला मिळावी असा प्रस्ताव आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांची लवकरच जागा वाटपासाठी बैठक होईल.
शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले : कोल्हापूर महापालिकेची निवडणूक आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढविणार आहोत. शिवसेनेकडे अनेकांनी उमेदवारीची मागणी केली आहे.निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस समितीसोबत प्राथमिक चर्चा झाली आहे. शिवसेनेला किती जागा हव्यात यासंबंधीचा प्रस्तावही दिला आहे.