विद्यापीठाला कुलगुरू नसणे हे भूषणावह आहे का ? सतेज पाटलांचा सवाल
schedule09 Oct 25 person by visibility 148 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘ छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने असलेल्या विद्यापीठाला कुलगुरू नसणे हे भूषणावह आहे का?’असा सवाल काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते व आमदार सतेज पाटील यांनी केला आहे. शिवाजी विद्यापीठाच्या ६३ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच कुलगुरूपद रिक्त राहिले असून शिक्षण क्षेत्रासाठी हे भूषणावह नाही. शिवाजी विद्यापीठाच्या विद्यमान कुलगुरूंचा कार्यकाळ सहा ऑक्टोबर २०२५ रोजी संपला असतानाही ९ ऑक्टोबरपर्यंत नवीन प्रभारी कुलगुरूंची नियुक्ती करण्यात आली नसल्याने आमदार पाटील यांनी ट्विट करून जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच कुलगुरू पद रिक्त राहणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. शिक्षणाबाबतची ही अनास्था महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांप्रती अन्याय आहे. ज्या दिवशी कुलगुरूंची निवड होते, त्याच दिवशी त्यांच्या कार्यकाळाची समाप्ती तारीख ठरलेली असते. मग वेळेवर पूर्णवेळ कुलगुरू नियुक्तीची प्रक्रिया का झाली नाही? आणि किमान प्रभारी कुलगुरूसुद्धा का नेमण्यात आले नाहीत? या सर्व परिस्थितीमुळे विद्यापीठातील विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. राज्यपाल कार्यालय व उच्च शिक्षण विभागाने तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे. कुठे नेऊन ठेवणार आहात महाराष्ट्र आमचा?” असा उद्विग्न सवाल उपस्थित करत आमदार सतेज पाटील यांनी शिक्षण व्यवस्थेकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे आवाहन केले आहे.