डेप्युटी सीईओ अरुण जाधव निलंबित, कोल्हापुरातील कामकाजावरुन कारवाई
schedule14 Oct 25 person by visibility 15591 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केलेले अरुण जाधव यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाचे उपसचिव सुभाष इंगळे यांनी निलंबनाचा आदेश काढला आहे. जाधव यांची जुलै २०२५ मध्ये कुडाळ पंचायत समितीच्या गटविकास अधिकारीपदी बदली झाली होती. सध्या ते सिंधुदर्ग जिल्हा परिषद येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदावर आहेत.निलंबन कालावधीत जाधव यांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मुख्यालय सोडता येणार नाही असे आदेशात म्हटले आहे. ग्रामविकास विभागाचे उपसचिव सुभाष इंगळे यांच्या सहीनिशी निलंबनाचा आदेश निघाला आहे. जाधव यांच्या कामकाजाबाबत तक्रारी झाल्या होत्या. जिल्हा परिषदेने अहवाल सादर केला होता.
जाधव हे कोल्हापूर जिल्हा परिषदेत १६ ऑगस्ट २०२० ते पंधरा जुलै २०२५ या दरम्यान उपमुख्य कार्यकारी होते. जाधव यांच्याकडून २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जनसुविधा, नागरी सुविधा व क वर्ग तीर्थक्षेत्र यात्रास्थळ योजनेच्या कामामध्ये दीडपटपेक्षा अधिक रकमेच्या प्रशासकीय मान्यता दिली होती. यामुळे कामात अनियमितता व नियमबाह्यपणे सीलबंद कपाटे उघडून पुराव्यामध्ये छेडछाड केल्याचे सकृत दर्शनी दिसून आले आहे असे आदेशात म्हटले आहे. तसेच त्यांनी, योजनेच्या कामासंदर्भातील काही नस्त्या, दस्तऐवज जिल्हा परिषद कार्यालयाकडे जमा केलेले नाहीत. त्यांच्याविरोधात शिस्तभंगविषयक कारवाई प्रस्तावित आहे.
जाधव हे मूळचे कागल तालुक्यातील मौजे सांगाव येथील आहेत. २००४ मध्ये सोलापूर जिल्हा परिषद येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले. भोर, तासगाव येथे गटविकास अधिकारीपदी काम केले आहे. त्यांनी हातकणंगले पंचायत समिती येथे काही वर्षे गटविकास अधिकारी हाते. २०२० मध्ये कोल्हापूर जिल्हा परिषद येथे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झाली होती.दरम्यान जाधव यांच्या कोल्हापुरातील कामकाजाबद्दल गर्जन संघटनेच्या प्रकाश बेलवडे यांनी तक्रार केली होती.