सीपीआरमधील वैद्यकीय बिलांच्या चौकशीसाठी समिती, पालकमंत्र्यांचे आदेशाने समिती स्थापन
schedule09 Dec 25 person by visibility 169 categoryआरोग्य
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : छत्रपती प्रमिनाराजे रुग्णालयात सरकारी कर्मचाऱ्यांच्या वतकीबिलांच्या मंजुरीसाठी आर्थिक लूट होत असल्यावरुन टीकेची झोड उठल्यानंतर या साऱ्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर चौकशी समिती स्थापन केली. शिवसेना ठाकरे पक्षाचे उपनेते संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे व इतर पदाधिकाऱ्यांनी सोमवारी आठ डिसेंबर रोजी सीपीआर येथे वैद्यकीय बिलांच्या मंजुरीतील भ्रष्टाचारा विरोधात आंदोलन केले होते. यावेळी त्यांनी जिल्हा चिकित्सकांच्या सोबत एका रूमची तपासणी केली. त्या ठिकाणी आढळलेल्या डायरीमध्ये वैद्यकीय बिलांच्या मंजुरीसाठी मॅडम व सर यांना दिलेल्या रकमेच्या नोंद आढळल्या. या साऱ्या प्रकाराची सरकारने गंभीरतेने दखल घेऊन चौकशी करावी आणि दोषीवर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती.
जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात वैद्यकीय बिलांसाठी घेतलेल्या रकमेची नोंदवही सापडल्याने वैद्यकीय देयेके पारित करण्यासाठी भ्रष्टाचार झाल्याचे मुद्दे माध्यमांमध्ये समोर आले आहेत. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री आबिटकर यांनी उपसंचालक, आरोग्य सेवा, कोल्हापूर मंडळ यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय चौकशी समिती नियुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत.या समितीत उपसंचालक, आरोग्य सेवा, कोल्हापूर मंडळ (अध्यक्ष), सहायक संचालक, आरोग्य सेवा, कोल्हापूर (हिवताप), आणि जिल्हा शल्यचिकित्सक, सांगली यांचा समावेश आहे. उपसंचालक, आरोग्य सेवा, कोल्हापूर मंडळ यांनी कार्यालयीन आदेश जारी करून समितीची स्थापना केली आहे.कोल्हापूर मंडळ आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. दिलीप माने हे चौकशी समितीचे अध्यक्ष आहेत. तर चौकशी समिती समिती सदस्य म्हणून सहायक संचालक आरोग्य सेवा संजय रणवीर, सांगली येथील जिल्हा शल्यचिकित्सक दिपक वरक काम पाहणार आहेत. ही समिती सविस्तर चौकशी करून आपला अहवाल सादर करणार आहे.