Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
केएमटी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या धर्तीवर सुधारित वेतनश्रेणी ! नगरविकासचा आदेश !!तिरुपती बालाजी येथे महाराष्ट्र सदन स्थापन करा, राजेश क्षीरसागरांची मुख्यमंत्र्यांच्याकडे मागणीबदली टप्पा क्रमांक सहामधील शिक्षकांना शाळांचा प्राधान्यक्रम नोंदविण्याची सुविधा २१ ऑगस्टपासून कोल्हापुरात  बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजनसहाय्यक प्राध्यापक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीबाबत लवकरच प्रक्रिया-मंत्री चंद्रकांत पाटील न्यू वूमेन्स कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये नेत्ररोग तपासणी शिबिरकोल्हापुरात 19 ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय वीज परिषद, वीज दरवाढीच्या विरोधात ठरणार आंदोलनाची दिशाकॉमर्स कॉलेजमध्ये डॉ. रंगनाथन यांची जयंती साजरीगोकुळ करणार आईस्क्रिम अन् चीज निर्मिती ! गडहिंग्लजला उभारणार म्हैस विक्री केंद्र !!शिक्षक संघ थोरात गटाची कोल्हापूर शहर कार्यकारिणीची घोषणा

जाहिरात

 

वर्षभर विनासुट्टी ! नाव आहे आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी!!

schedule08 Oct 20 person by visibility 2772 categoryसंपादकीय

 बदलीच्या आदेशानंतर कोल्हापूरकरांनी व्यक्त केल्या कृतज्ञतेच्या भावना

आप्पासाहेब माळी/कोल्हापूर : धडाडीचे अधिकारी आणि चांगल्या कार्याचे कोल्हापूरकरांनी नेहमीच कौतुक केले. एखादी व्यक्ती, अधिकारी, राजकारणी, खेळाडू आवडला की त्याला डोक्यावर घेण्याची इथली जणू परंपरा. डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आयुक्तपदाच्या कालावधीत आपल्या कामकाजातून कोल्हापूरकरांची मने जिंकली. ना मोठ्या पदाचा रुबाब, ना अधिकारवाणी. सगळयांना सोबत घेऊन कामकाज करण्याच्या स्वभावामुळे त्यांच्या बदलीनंतर कोल्हापूरकर त्यांच्याप्रती कृतज्ञतेचा भाव प्रकट करत आहेत. सलग ७५ रविवारी कोल्हापुरात स्वच्छता अभियान राबवून त्यांनी एका वेगळया कामगिरीची नोंद केली. ‘स्वच्छ कोल्हापूर, सुंदर कोल्हापूर’ या संकल्पनेला मूर्त रुप देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. पावसाळा असो, उन्हाळा असो की हिवाळा, स्वच्छता अभियानमध्ये कधी खंड पडला नाही. यामुळे त्यांच्या बदलीनंतर ‘वर्षभर विनासुट्टी,नाव आहे आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी’ या आशयाच्या पोस्ट सोशल मिडियात झळकत आहेत.

कलशेट्टी यांनी प्रशासकीय कामकाज करताना त्याला सामाजिक चेहरा दिला. जे कर्मचारी, अधिकारी सोबत आहेत, ज्या संस्था स्वच्छता कामात सक्रिय आहेत त्यांची साथ घेऊन शहराच्या विविध भागात अभियान राबवायचे हे त्यांचे साधे सूत्र होते. ‘स्वच्छ कोल्हापूर’चा त्यांनी ध्यास घेतला. सुट्टीच्या दिवशी अधिकारी, कर्मचाऱ्यांना सोबतीला घेऊन ते शहराचा विविध भाग स्वच्छ करु लागले. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांना या अभियानमध्ये साथ दिली. काही जणांनी,मात्र रविवारच्या हक्काच्या सुट्टीवर गदा आल्याने नाक मुरडली. केवळ स्वच्छता अभियानवर फोकस राहिल्याने इतर कामावर परिणाम झाल्याचा टीकेचा सूरही काहींनी आळवला.

 मात्र कलशेट्टी यांची दिशा स्पष्ट होती. जे सोबतीला येतील त्यांना घेऊन ते स्वच्छतेची वाट चालत राहिले. जयंती नाल्याला मूळ नदीचे रुप प्राप्त होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. पंचगंगा नदी घाट, रंकाळा चौपाटी परिसर, ऐतिहासिक वास्तू, धार्मिक स्थळ अशा प्रत्येक ठिकाणी स्वच्छतेचा झाडू फिरवला. महत्वाचं म्हणजे स्वच्छता अभियानला त्यांनी लोकचळवळीचं स्वरुप दिलं. या स्वच्छता अभियानचे महत्व लोकांना गेल्यावर्षी महापुराच्या कालावधीत उमगलं. नाले, गटारी साफ झाल्यामुळे कोल्हापूरची तुंबाई झाली नाही. पाण्याचा निचरा झपाट्याने झाला. यामुळे नागरी वस्तीत पाणी शिरण्याचा धोका कमी प्रमाणात उद्भवला.

त्यांच्या बदलीच्या आदेशानंतर सोशल मिडियावर त्यांची स्वच्छता कामगिरी झळकली. अनेकांनी त्यांच्याशी निगडीत आठवणी, स्वच्छता अभियानमधील कामगिरी, फोटो सोशल मिडियावर प्रसिद्ध करत एका अर्थी त्यांच्या कामगिरीला सॅल्यूट केले. काहींनी त्यांना भविष्यकाळात ‘जिल्हाधिकारी’म्हणून कोल्हापूरला परत या ’अशी भावनिक साद घातली. गेल्यावर्षी महापुराचा विळखा आणि यंदा कोरोनाची महामारी या दोन्ही आपत्तीच्या कालावधीत कलशेट्टी हे लोकांच्या सोबत होते. अधिकारपदाची झूल उतरवून लोकांना दिलासा देण्यासाठी शहरभर पायाला भिंगरी बांधल्यासारखे धावपळ करत होते. त्यांच्या अचानक बदलीने धक्का बसल्याची प्रतिक्रियाही सोशल मिडियात उमटत आहेत.                                .........कोल्हापूरकर म्हणतात..............................    सुर्यकांत पाटील बुद्धिहाळकर रोटरी मूव्हमेंट ः आयुक्त मल्लिनाथ कलशेटी हे एक हाडाचा कार्यकर्ता असणारा अधिकारी आहेत. आलेल्या प्रत्येक दिवसापासून स्वच्छतेचा पुरस्कार करून. कोल्हापूरच्या जनसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेतली. जयंती नाला स्वच्छता कार्यक्रम, पूरस्थितीत मदत कार्य व सध्याच्या कोरोना महामारीच्या कालावधीत शिस्तपालनाची तळमळ अशा गोष्टी केल्या.

.................

चेंबर ऑफ कॉमर्सचे सचिव जयेश ओसवाल : कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासनात डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी उत्कृष्ट काम करुन कोल्हापूरच्या जनतेची मने जिंकली आहेत. ‘स्वच्छ कोल्हापूर, सुंदर कोल्हापूर’चा त्यांनी ध्यास घेतला होता. त्यांच्या कार्यास मानाचा मुजरा.

…………….

बांधकाम व्यावसायिक चंद्रकांत कांडेकरी : डॉ. कलशेट्टी यांनी जयंती नाल्याची साफसफाई करुन तिला जयंती नदीचे स्वरुप देण्याचा आटोकाट प्रयत्न केला. स्वच्छतेचा विषय निघाला की अशा उत्तम अधिकाऱ्याची कारकीर्द कायम कोल्हापूरकरांच्या स्मरणात राहिल.

…………………………………

शेअर केले अभियान व कार्यक्रमाचे फोटो

आयुक्त म्हणून कार्यरत असताना डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांचा विविध समाज घटकांशी निकटचा संबंध आला. प्रशासकीय कामकाजापासून ते सामाजिक कार्यक्रमात ते सामील झाले. त्यांच्या सोबतच्या आठवणी, फोटो शेअर करत नागरिकांनी कलशेट्टी यांच्या ‘स्वच्छ व सुंदर कोल्हापूर’संकल्पनेचे कौतुक केले. महेश उरसाल, अष्टविनायक चव्हाण, अभिजित बुकशेठ, जगदीश गुरव, विश्वनाथ कोरी, शिवप्रसाद घोडके आदींनी त्यांच्या कामगिरीविषयी गौरवोल्लेख केला. तसेच फोटो शेअर करत कलशेट्टींचे कोल्हापूरशी जुळलेल्या नाते अधोरेखित केले.


जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes