बाजार समितीच्या ५५ माजी संचालकांना नोटीस, जिल्हा सहकार उपनिबंधकांची कार्यवाही
schedule02 Jun 25 person by visibility 49 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील १९९३ ते २०१३ या कालावधीतील नियमबाह्य भरती, आर्थिक गैरव्यवहार याद्वारे समितीच्या झालेल्या नुकसानीबाबत माहिती घेण्यासाठी जिल्हा सहकार उपनिबंधक कार्यालयाने ५५ माजी संचालकांना नोटिसा पाठविल्या आहेत. या साऱ्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती नेमली आहे. या चौकशी समितीसमोर माजी संचालकांना म्हणणे मांडावे लागणार आहे. ज्यांना नोटिसा पाठविल्या आहेत, त्यामध्ये सर्वपक्षीय संचालकांचा समावेश आहे. संबंधित संचालकांनी केलेल्या भरती प्रक्रियेतील २१ कर्मचाऱ्यांची यादीच नोटिसीत आहे. नोटिसा काढलेल्या संचालकांच्या यादीमध्ये माजी सभापती-उपसभापतींचा समावेश आहे. बाजार समितीच्या कारभाराविषयी ज्या त्या काळात तक्रार झाल्या होत्या. संचालक मंडळाने केलेले बेकायदेशीर ठराव, दौरे,खर्च, नोकरभरती, भूखंड व्यवहार, बाजार समितीच्या ठेवी पतसंस्थेत ठेवणे अशा तक्रारी आहेत.