स्वातंत्र्यदिनापासून धावणार ई बसेस ! कोल्हापुरात होणार सिमेंटचे रस्ते !!
schedule31 May 25 person by visibility 106 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शहरातील विविध भागातील खराब रस्ते, ठिकठिकाणी पडलेले खडे, पावसाळयात खड्ड्यात साचल्यामुळे होणारे लहानसहान अपघात… हे नेहमीचे चित्र. येत्या काही वर्षात कोल्हापुरातील हे चित्र कायमस्वरुपी बदलण्यासाठी सगळे रस्ते सिमेंटचे करण्यात येणार आहे. शहरातील मुख्य रस्ते, उपरस्ते, अंतर्गत रस्ते सिमेंटचे करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी शहरातील सिमेंट-काँक्रिटच्या रस्त्यासाठी पुढाकार घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांनी चर्चा केली आहे. विशेष म्हणजे, राज्य सरकारच्या निधीतून रस्ते करण्यात येणार आहेत. सिमेंट रस्त्याचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करणार आहे.
शहरात एकूण किती रस्ते आहेत ? प्रमुख रस्ते किती लांबींचे, उपरस्ते आणि अंतर्गत रस्ते किती या साऱ्यांची माहिती संकलित केली जात आहे. सिमेंट रस्तासंबंधी प्रस्ताव तयार केला जात आहे. येत्या आठ दिवसात यासंबंधी महापालिका अधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोल्हापूर शहरात सिमेंटचे रस्ते तयार करण्यासाठी आवश्यक सगळा निधी देऊ असे सांगितले आहे. यामुळे येत्या काही वर्षात कोल्हापुरातील रस्ते हे दर्जेदार होतील. खड्डयांची समस्या उरणार नाही. कोल्हापुरातील प्रवास हा सुसह्य होईल आणि नागरिकांनाही दरवर्षी खराब रस्त्यांचा प्रश्न भेडसावणार नाही असे खासदार महाडिक म्हणाले. सिमेंटचे रस्ते दर्जेदार होतील याकडे आपण स्वत: सर्व कामावर लक्ष घालणार आहोत.
कोल्हापूरला १५० बसेस मंजूर, पंधरा ऑगस्टला ५० बसेस येणार
केंद्र सरकारकडून कोल्हापूरसाठी १५० ई बसेस मंजूर आहेत. नवी दिल्लीत या बसेस तयार आहेत. कोल्हापूरला एकूण तीन टप्प्यात बस उपलब्ध होतील. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ५० बसेस येतील. येत्या १५ ऑगस्ट २०२५ पासून कोल्हापुरात ५० बसेस धावणार आहेत. या ई बसेससाठी आवश्यक यंत्रणा, चार्जिंग सेंटर उभारणीचे काम सुरू आहे. असेही महाडिक यांनी सांगितले.