गायक महमंद रफी आणि ठाकरे कॉम्बिनेशनमधून बहारदार मराठी गाणी
schedule30 Jul 21 person by visibility 772 category

सतीश घाटगे, महाराष्ट्र न्यूज 1कोल्हापूर :
स्वर्गीय महंमद रफी यांनी हिंदीसह विविध भाषांत सात हजारहून अधिक गाणी गाऊन रसिकांना तृप्त केले. आजही रफींच्या गाण्यांची मोहिणी टिकून आहे. संगीतातील या तानसेनाकडून मराठी भावगीते, भक्तीगीते आणि गझल ही गाणी गाऊन घेतली ती शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे बंधू, राज ठाकरे यांचे वडील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे काका संगीतकार श्रीकांत ठाकरे यांनी. ‘प्रभू तू दयाळू’, ‘शोधीसी मानवा, राऊळी मंदिरी’, ‘हा छंद जिवाला लावी पिसे’, ‘ये पोरी संभाळ, दर्याला तुफान आलंय भारी’ अशी चौदा ते पंधरा अवीट मराठी गाणी रफीने आजरामर केली. गीतकार वंदना विटणकर, संगीतकार श्रीकांत ठाकरे आणि गायक महमंद रफी हे कॉम्बिनेशन मराठी भावगीतात परफेक्ट ठरले. ३१ जुलै हा श्रेष्ठ गायक महमंद रफी यांचा स्मृतीदिन. त्यानिमित्त त्यांच्या भावगीतांचा धांडोळा घेतला आहे.
प्रबोधनकार ठाकरे यांचा वारसा चालवणाऱ्या ठाकरे घराण्यात कलेची परंपरा कायम आहे.शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे व्यंगचित्रकार, श्रीकांत ठाकरे संगीतकार, राज ठाकरे व्यंगचित्रकार आणि तबला वादक, उद्धव ठाकरे फोटोग्राफर ही कला आणि छंदाची परंपरा कायम टिकून आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अमाप प्रसिद्धी मिळाली. त्यांनी जनतेच्या हदृयात स्थान मिळवले. तर श्रीकांत ठाकरे यांनी शांतपणे आपली संगीताची कला जोपासली. हेमंतकुमार, मन्ना डे, भुपेंद्र, शैलेंद्र सिंग, तलत मेहमूद, येशुदास, किशोरकुमार, या अमराठी गायकांनी मराठी चित्रपटगीते, भावगीते, भक्तीगीते गायिली. अमराठी गायक महेंद्र कपूर याला तर मराठी गायकच समजले जाते. पण महान गायक महमंद रफी यांच्या रसिल्या गळ्यातून सुंदर मराठी भावगीतांची मैफल जमवून घेतली ती श्रीकांत ठाकरे यांनी.
आकाशवाणीवर प्रभातवंदनमध्ये ‘प्रभू तू दयाळ“, शोधीसी मानवा, राऊळी मंदिरी’, ‘नको आरती की, नको पुष्पमाला’ या गीतांनी महमंद रफीच्या गीतांनी ओळख झाली होती. पण या गाण्याचे संगीतकार श्रीकांत ठाकरे हे फार उशिरा कळाले. श्रीकांत ठाकरे व्हायेलिन उत्तम वाजवायचे नव्हे तर त्यांची हुकुमत होती. सारंगी या वाद्याचे त्यांना आकर्षण होते. मराठी भावगीतांत महमंद रफी यांच्या सारख्या गायकाकडून गाणी गाऊन घेण्यासाठी श्रीकांत ठाकरे यांनी अतिशय कष्ट घेतले. ते उर्दु शिकले होते. रफीकडून गाणी गाऊन घेताना ते मराठी गाणी उर्दुत लिहायचे. कोणत्या शब्दावर जोर द्यायचा. त्या शब्दाचा अर्थ रफीला समजावून सांगायचे. त्यामुळे रफीची मराठीतील गाणी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ठरली. “अरे ए दु:खी जीवा बेकरार होऊ नको” हे मराठीतील श्रीकांत ठाकरेंच्या संगीत दिग्दर्शनाखाली रफीने गायिलेले पहिले गाणे. पण शोधीसी मानवा, राऊळी मंदिरी या गाण्यानंतर मराठीमध्ये रफी युग सुरू झाले. ठाकरे. विटणकर आणि रफी यांनी बारा ते तेरा गाण्यांनी संगीतप्रेमींना अक्षरश: वेड लावले.
‘तुझे रुप सखे गुलजार काहूर मनी उठले भलते, दिनरात तुझा ग ध्यास जडे, हा छंद जिवाला लावि पिसे’ या गाण्यांने रसिकांना डोलायला लावले. ‘हा रुसवा सोड सखे, पुरे हा बहाणा’ या रफीच्या गाण्यांने तरुणालाईला वेड लागले. या गाण्याची सुरुवात रफीने ‘अगं ये’ आणि शेवट सोड ना अबोला या खास रफी टचमध्ये केली आहे. “अग पोरी संभाल दर्याला तुफान आईलय भारी” हे कोळी गीत गायिले आहे. या गाण्यात रफीला साथ दिली आहे ती पुष्पा पागधरे या गायिकेने. “माझ्या विराण हृदयी पाहु नकाच कोणी”, “विरले गीत कसे”, “नको आरती कि नको पुष्पमाला”, “नको भव्य वाडा” अशी गाणी रफी गाऊन गेला. महंमद रफींचे हसा मुलांनो हसा हे बालगीत तर आपली आवड ला फेव्हरिट गाणे होते.
आजही महमंद रफीची भावगिते ऐकावी वाटतात. रफी जरी अमराठी असले तरी त्यांनी ज्या पद्धतीने मराठी गाणी गायिली आहेत ते पाहून मराठी गायकच आहेत असा भास होतो. भारतीय संगीत विश्वास सेवा दिलेल्या महमंद रफीकडून गाणी गाऊन घेतलेल्या संगीतकार श्रीकांत ठाकरे यांचे ऋण मराठी रसिक कधीच विसरु शकणार नाही.
महमंद रफी यांची मराठी गाणी
गाणे गीतकार संगीतकार
शोधीसी मानवा, राऊळी मंदिरी
नको आरती, नको पुष्पमाला
प्रभू तू दयाळू
हसा मुलांनो हसा,
हा रुसवा सोड सखे
खेळ तुझा न्यारा
हा छंद जीवाला लावी पिसे
हे माना आज कोणी
अगं पोरी संभाळ दर्याला तुफान आलंय भारी
माझ्या विराण हृदयात
विरते गीत कसे झाली
नको भाव वाढवो
अरे दु:खी जीवा बेकरार
खेळ तुझा न्यारा
हे मना आले कोणी