बाजार समितीची दोन्ही पदे राष्ट्रवादीकडे ! सभापतीपदी सुर्यकांत पाटील, उपसभापतीपदी राजाराम चव्हाण !!
schedule07 Jul 25 person by visibility 213 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुर्यकांत रघुनाथ पाटील
(बाचणी) यांची तर उपसभापतीपदी राजाराम तुकाराम चव्हाण (येळवण जुगाई) यांची निवड झाली. शहर उपनिबंधक प्रिया दळणार यांच्या
अध्यक्षतेखाली संचालकांची बैठक झाली. या बैठकीत नूतन सभापती व उपसभापतींची निवड करण्यात आली. पाटील हे मंत्री मुश्रीफ यांचे
समर्थक तर चव्हाण हे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक मानसिंगराव गायकवाड यांचे समर्थक आहेत. या पदाधिकाऱ्यांचा कालावधी हा
एकेक वर्षाचा आहे.
बाजार समितीच्या सभापती व उपसभापती निवडीसाठी नेते मंडळीची रविवारी (६ जुलै) कोल्हापुरात जिल्हा मध्यवर्ती बँकेत बैठक झाली होती.
मंत्री मुश्रीफ, आमदार सतेज पाटी, माजी आमदार के. पी. पाटील, जिल्हा बँकेचे माजी संचालक गायकवाड, जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन
आबिटकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांची बैठक झाली. या बैठकीत बाजार समितीसाठी सभापती व उपसभापतींची नावे
निश्चित झाली.
नूतन पदाधिकारी निवडीसाठी सोमवारी, दुपारी तीन वाजता बाजार समितीत बैठक झाली. तत्पूर्वी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भैय्या माने व
गोकुळचे संचालक युवराज पाटील हे नावांचा बंद लखोटा घेऊन बाजार समितीत पोहोचले. सोबत गोकुळचे संचालक प्रा. किसन चौगुले होते. यानंतर झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत पदाधिकारी निवडी करण्यात आल्या. या दोन्ही निवडी बिनविरोध झाल्या. सभापतीपदासाठी पाटील यांच्या नावाला संचालक प्रकाश देसाई हे सूचक तर संचालक संदीप वरांडेकर यांनी अनुमोदन दिले. उपसभापतीपदासाठी चव्हाण यांच्या नावाला संचालक सुयोग वाडकर हे सूचक तर संचालक सोनाली पाटील यांनी अनुमोदन दिले.बैठकीला संचालक भारत पाटील, शंकर पाटील, शेखर देसाई, बाळासाहेब पाटील, पैलवान संभाजी पाटील, मेघा राजेंद्र देसाई, सोनाली शरद पाटील, शिवाजीराव पाटील, नानासो कांबळे, पांडूरंग काशीद, नंदकुमार वळंजू, कुमार आहुजा, दिलीप पोवार, सचिव तानाजी दळवी, उपसचिव वसंत पाटील आदी उपस्थित होते.